"स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे. त्यांचे ते उत्तम पोशाख, रेड कार्पेटवर त्यांचं चालणं, त्या जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराझींची झुंबड, त्यांचा कॅमेऱ्यासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर, त्यांचं ते डोळे लखलखून टाकणारं ग्लॅमर. पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजू आहे, ज्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. कास्टिंग काऊच, त्यांचं सतत होणार 'बॉडी शेमिंग', त्यांच्या लैंगीक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह, सोशल मीडियावर होणारं कंबरेखालचं ट्रोलिंग, आजूबाजूला जवळचे मित्रच शिल्लक न राहिल्याने त्यांच्यावर आलेलं एकटेपण, आणि असे अनेक पैलू या काळोख्या बाजूला आहेत. आज आपण मनोरंजन क्षेत्रातल्या अशा काही स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी या अन्यायकारक आणि काळोख्या बाजूबद्दल आवाज उठवला. या स्त्रिया कदाचित सगळ्यात मोठ्या स्टार नसतील, त्यांचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते नसतील, त्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत नसतील पण या खऱ्या रॉकस्टार आहेत. कारण त्यांनी फक्त व्हिक्टीम होण्याचं नाकारलं, आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला."